साखर, गूळ, मध: कधी, कुठे, काय व किती वापरावे ?

 *साखर, गूळ, मध: कधी, कुठे, काय व किती वापरावे ?*

सध्या लोक हेल्थ कॉन्शस झाले आहेत. पदार्थांना गोडवा आणण्यासाठी साखरेऐवजी गूळ वापरा हे तर सध्याचे ब्रीदवाक्य आहे ! गुळाबरोबर मध हादेखील हेल्दी मानला जातो. लिंबू-मध-पाणी असे हेल्थ ड्रिंक रोज सकाळी घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.


पण साखर, गूळ व मध यामध्ये काय फरक आहे व त्यांचा वापर किती आरोग्यदायी आहे हे आपण जाणून घेऊयात.


*कॅलरीज*

साखर, गूळ व मध या तीनही पदार्थांमधून साधारण सारख्याच प्रमाणात कॅलरीज मिळतात ( १ चमचा = २0 कॅलरीज). त्यामुळे वजन कमी करू इच्छिणाऱ्यांनी या सर्व पदार्थांचा वापर जपूनच करायला हवा.


*कर्बोदके*

या तीनही पदार्थांमधून साधारण सारख्याच प्रमाणात कर्बोदके मिळतात (१ चमचा = ५ ग्रॅम). रक्‍तातील साखर तेवढ्याच प्रमाणात वाढते. त्यामुळे मधुमेही व्यक्‍तींनी साखरेऐवजी तितक्याच प्रमाणात गूळ किंवा मध वापरणे योग्य नाही.


*जीवनसत्त्वे*

साखर तयार करताना उसाच्या रसावरती बऱ्याच प्रक्रिया केल्या जातात. या प्रक्रियेदरम्यान त्यातील सर्व जीवनसत्त्वे व खनिजद्रव्ये नष्ट होतात.


याउलट गूळ व मध हे दोन्ही पदार्थ तयार करताना त्यामानाने कमी प्रक्रिया केल्या जातात. गूळ तयार करण्याच्या प्रक्रियेदरम्यान त्याच्यामधील लोहाचे प्रमाण वाढते. त्यामुळे रक्‍तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी असणाऱ्यांनी साखरेऐवजी गूळ वापरावा. लोहाबरोबरच गुळामध्ये ‘ ब ‘ जीवनसत्त्वही असते.


मधामध्येदेखील ‘ब’ जीवनसत्त्व आढळते. याचबरोबरमधामध्ये काही औषधी गुणधर्मदेखील असतात. ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्‍ती वाढण्यास मदत होते. यामुळे सर्दी, खोकला, कफ झाला असताना मध वापरावा.


*फॅट्स*

बऱ्याच जणांचा असा गैरसमज आहे की साखरेमध्ये फॅट्स नसतात. पण यात तथ्य नाही. जास्त प्रमाणात आहारात घेतलेली साखर तुमचे शरीर फॅट्सच्या स्वरूपात साठवून ठेवते. त्यामुळे साखरेने शरीरातील फॅट्स वाढतात.


हे लक्षात ठेवा

गोड पदार्थ बनविताना पदार्थांना गोडवा आणण्यासाठी साखरेऐवजी गूळ किंवा मध

वापरणे चांगले. पण या तीनही पदार्थाचा अतिरेक टाळा. मधुमेही व स्थूलता असणाऱ्यांनी याकडे काळजीपूर्वक लक्ष द्या.

साखर किंवा गुळाऐवजी गोडवा आणणारे इतर पदार्थ उदा. खजूर, ज्येष्ठमध, मनुके यांचा वापरकरा.

जिथे शक्‍य आहे तिथे साखर वापरणे टाळा. उदा.- ताज्या फळांचे रस साखर न घालता घ्या. शक्‍यतो फळांचा रस घेण्याऐवजी ताज्या फळांनाच प्राधान्य द्या.

प्रक्रिया केलेली तयार पेये, शीतपेये टाळा. त्यात भरपूर साखर असते.

चहा व कॉफी पीत असाल तर त्यामध्ये कमी साखर घाला किंवा साखर न घालता घ्या. साधा चहा किंवा कॉपीऐवजी ग्रीन टी किंवा लेमन टी वापरा

बेकरीतील पदार्थ (केक, बिस्किटे ), गोड पदार्थ,जॅम, चॉकलेट यामधूनही भरपूर प्रमाणात साखर शरीरात जात असते. हे पदार्थ रोजच्या आहारात घेणे टाळा. 



Post a Comment

0 Comments