कसे जेवावे

मुकाट्याने खाली मान घालून न बोलता जेवा,.... असा जेव्हा दटावणीतील आवाज यायचा तेव्हा..... अचानक कलकलाट बंद होऊन, निमूटपणे फक्त घास चावतानाचे, ताटातील वाट्या व पेल्यांचे आवाज कानावर पडत. आम्ही पोरे पंगतीत बसतानाच कलकलाट सुरू करायचो, इतका की जवळपास बसलेल्या जेष्ठांचे मस्तक ठणकायचे. त्यातील एखादा दमदार व्यक्ती आपला अस्सल आवाज काढून आमचा आवाज घशातच दाबायचा.

अन्न कश्या पद्धतीने जेवले  पाहिजे, त्याबद्दल सविस्तर लेख वाचनात आलेले नाहीत.  मी काही प्रयोग केले व त्यातून मला जी अनुभूती मिळाली, त्यावर आधारित मी हा लेख आपल्या समोर मांडत आहे. 

मानव प्रगती करू लागला, त्याचा सर्वांगाने विकास होऊ लागला, हे होत असताना त्याने खाण्या-पिण्याच्या आपल्या सवयी बदलल्या, किव्वा त्याला बदलाव्या लागल्या, त्यातून त्याचा फायदा होण्यापेक्षा नुकसान जास्त झाले आहे. मी काही आहार तज्ञ नाही, त्यामुळे  त्या विषयाशी संबंधित काही भाष्य करणार नाही, तर केवळ स्वानुभव सांगण्याचा प्रयत्न करत आहे.  पूर्वी घरात पाटावर बसून समोर ताट खाली ठेऊन जेवण्याची प्रथा होती, पण आजकाल आपण डायनींग टेबलचा वापर करतो, त्यात गैर आहे असेही मी मानत नाही. खाली किव्वा टेबलावर बसून, कसे जेवायचे व त्यामुळे काय फायदे होतात इतकेच दर्शवणारा हा लेख आहे.

सर्वाना हे माहीत आहेच की हात स्वच्छ धुवून जेवायला बसावे. जेवण्यास सुरुवात केल्यावर शक्यतो बोलणे टाळावे, असे केल्याने जेवण्याचा आस्वाद घेता येतो, तसेच जीभ, गाल व ओठ आपल्याच दाताने चावल्यामुळे होणारी इजा टळते. अनेक वेळा जीभ, ओठ, गाल चावले जातात, याचे कारण लक्ष जेवणात नसून टीव्ही वरच्या सिरीयल मध्ये असते, किव्वा उगीच आपण बडबड करतो ज्यामुळे आपल्या मेंदूचे एकाच वेळी अनेक क्रिया करताना, योग्य नियंत्रण रहात नाही व असा अपघात घडतो.

जेवणाच्या ताटाकडे आरश्यात पहिल्यासारखे करून, घास तोंडात घ्यावा. घास तोंडात घेतला की ओठ बंद करावे, व घास चावण्यास आरंभ करावा. घास संपूर्ण चावून गिळेपर्यंत मान वाकलेल्या स्थितीत म्हणजे जवळपास नव्वद अंशात ठेवल्यास, मुबलक प्रमाणात ग्रंथीतून लाळ स्रवते, व घासात ती भरपूर मिसळल्याने, पुढे पचन क्रियेसाठी फायदा होतो. जर आपण मान सरळ ठेऊन म्हणजे टीव्हीकडे पहात घास चावत राहिलो तर योग्य प्रमाणात लाळ मिसळली जात नाही, तसेच घासाचा पूर्ण भुगा न होता घास घशातून अन्न नलिकेत ढकलला जातो, त्यामुळे अर्धवट चावलेला घास अन्न नलिकेत सरकून पोटात गेल्याने अपचन होण्याची शक्यता वाढते.

खरं तर, चावलेला घास आपोआप अन्न नलिकेत न जाता, आपल्या इच्छेने गेला पाहिजे. मान खाली ठेऊन चावत राहिल्याने घास घशात पोहोचताच नाही, तो दातांच्या कचाट्यात राहतो, व तिथेच फिरत राहून  त्याचे पेस्ट किव्वा घट्ट रसात रूपांतर होते. असे झाले हे समजले की, मगच मान वर केल्यास घास घशात जाऊन पुढे आपोआप अन्न नलिकेत जाईल, ज्याला यथार्थपणे गिळणे म्हणता येईल.

एक मात्र खरे, असे जेवण करायला आपल्याला किमान अर्धा तास द्यावा लागेल, यातून एक घास बत्तीस वेळा चावण्याची अनुभूती आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही. लाळ ग्रंथी जिभेच्या खाली असतात, त्यांचे तोंड दातांच्या बाजूने उघडते, व जिभेच्या दाबाने लाळ सर्वत्र पसरते, तिथेच घासाची भुकटी होत असते, तेव्हाच त्यात लाळ मिसळत राहिल्याने, आणि ठराविक वेळ चावल्याने, रासायनिक प्रक्रियेने घासाची काही प्रमाणात साखरेत रूपांतरित होण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने, आपल्याला घासात गोडवा जाणवू लागतो, तोच घास पूर्णपणे चावला गेला असे समजावे.

थोरामोठ्यांचे बोल  कडू वाटले तरी शास्त्रीय दृष्ट्या ते योग्य असतात, याच्या अनेक उदाहरणापैकी हे पण एक उद्बोधक उदाहरण आहे.

गाई, म्हशी चारा भसाभस खातात, व आराम करताना, पोटातील अन्न पुन्हा बाहेर काढून चावून, भुगा करून खातात, ज्याला रवंथ करणे म्हणतात, ही देणगी निसर्गाने मानवाला दिलेली नाही, तसेच कुत्रा, मांजर यांच्या पोटात जहाल रसायने बनतात जी हाडे सुद्धा विरघळून टाकतात ती पण देणगी आपल्याला नाही. आपल्या पोटात होणारी रासायनिक प्रक्रिया ठोस कणांना किव्वा दाण्यांचा भुगा करू शकत नाही, व ते विष्ठेतून आहे तसेच बाहेर पडतात. याचा परिणाम म्हणजे ऊर्जा उत्पन्न करण्यासाठी साखर (glucose) बनवण्याची, आपल्या शरीराची कार्यक्षमता (Efficiency) मंदावते व वेळेआधीच भूक लागते, किंवा खाण्याची इच्छा लवकर जागृत होते.

म्हणून मुकाट्याने, मान खाली घालून जेवणे हिच योग्य रित आहे, जिचा अवलंब काटेकोरपणे केल्यास अपचनाचा विकार होणार नाही. 

Post a Comment

0 Comments